श्लोक १
श्रीमद्भगवद्गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग)
अथ प्रथमोऽध्यायः
धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १-१ ॥
अन्वयार्थ-धृतराष्ट्र = धृतराष्ट्र, उवाच = म्हणाले, सञ्जय =
हे संजया, धर्मक्षेत्रे = धर्मभूमी असलेल्या, कुरुक्षेत्रे = कुरुक्षेत्रावर, समवेताः =
एकत्र आलेल्या, युयुत्सवः = युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः =
माझ्या मुलांनी, च = आणि, एव = तसेच, पाण्डवाः = पांडू
पुत्रांनी, किम् = काय, अकुर्वत = केले ॥ १-१ ॥
अर्थ- “हे संजया! धर्मक्षेत्र मानल्या जाणा-या कुरुक्षेत्रावर
युद्धाच्या इच्छेने जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनीकाय केले?”
स्पष्टीकरण- इथे सुद्धा धृतराष्ट्राचा स्वतःच्या पुत्रांबद्दलचा अंध
मोह स्पष्ट दिसतो. मामकाः म्हणजे माझ्या आणि पाण्डवाः म्हणजे पांडूच्या पुत्रांनी काय
केले असे तो संजयाला विचारतो.
भगवान श्रीकृष्णांची शांततेची बोलणी कौरवांनी व्यर्थ ठरवल्यावर युद्धाशिवाय पर्याय
नव्हता. ज्या कारणापासून श्रीकृष्ण धृतराष्ट्राला परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते.
तो पुत्रमोहच युद्धाला कारण ठरला. आसक्ती हीच नाशाला कारण ठरते. धृतराष्ट्र हा पुत्राच्या
आसक्तीने धर्मांध झाला होता. असे म्हणायचे कारण तो जरी दुर्योधनाचा पिता असला तरी आधी
तो हस्तिनापूरचा राजा होता. केवळ पुत्र प्रेमापोटी संपूर्ण राज्याला युद्धात ओढणे आणि
पुढे सर्वनाश अटळ हे स्पष्ट दिसत असून देखील राजाचे कर्तव्य विसरून पुत्राच्या प्रेमाला
अवास्तव महत्व देणे हे धृतराष्ट्राला अशोभनीयच होते.
युधिष्टिर केवळ धृतराष्ट्राचा शब्द मोडायचा नाही आणि क्षत्रियाने आलेले बोलावणे नाकारू
नये या शास्त्र वचनापोटी द्यूत खेळला. महाभारतात ठीकठिकाणी धृतराष्ट्राचा आपपर भाव
लपून राहत नाही.
युद्धासाठी कुरुक्षेत्रच का? तर
१) “कुरुक्षेत्र महापुण्यम् सर्व तीर्थो निषेविदम्।“
असे वामन पुराण सांगते. याला वैदिक कालखंडात “ब्रह्मावर्त” असे नाव होते.
२) भगवान परशुरामांनी स्वतःच्या पित्याच्या हत्येचा प्रतिशोध घेताना
क्षत्रियांच्या रक्तापासून येथे पाच कुंडे बनवली पुढे पितरांच्या आशीर्वादाने ती पवित्र
जलाशयात परिवर्तीत झाली.
३) कुरु राजाने आधी सोन्याच्या नांगराने नांगरून व नंतर इंद्राकडून
वर प्राप्त करून घेतला कि ह्या भूमीला धर्मक्षेत्र म्हणले जावे. जे लोक येथे स्नान करतील
वा मृत्यू पावतील त्यांना महापुण्याची प्राप्ती व्हावी. थोडक्यात जिथे धर्मार्थमोक्षाची
प्राप्ती होते ते धर्मक्षेत्र!
या आधीच सांगितल्याप्रमाणे हे धर्मयुद्ध होते. जरी द्वापरयुग असले तरी कलियुगाचा प्रभाव
हा सर्व युगात कमी अधिक प्रमाणात होताच. दुर्योधनात कलीचा अंश होता. म्हणून तर त्याला
द्यूत, मद्यपान व परस्त्रीची अभिलाषा यात रस होता. त्यात शकुनी मामाचा सल्ला! मग काही
विचारता सोय नाही. महाभारतातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टींपैकी अत्यंत महत्वाची गोष्ट
म्हणजे सल्ला हा योग्य व्यक्तीचा घ्यावा. अन्यथा परिणाम आपल्या समोर आहेत. अर्जुनाने
भगवान श्रीकृष्णांचा सल्ला घेतला आणि आत्मोन्नती साधली. तर दुर्योधन शकुनीचा सल्ला
घेऊन स्वतःचे राज्य व स्वतःचे कुळ गमावून बसला. आपल्या समोर देखील आयुष्यात बरेच निर्णायक
प्रसंग येतात. मनुष्य जिथे काय करावे? काय निर्णय घ्यावा या मानसिक द्वंद्वात अडकलेला
असतो. कर्तव्य आणि भावना यात गल्लत झाली की असे प्रसंग उद्भवतात. अशा प्रसंगी अर्थातच
त्याला कुणातरी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागतो. तेव्हा निश्चितच तो भगवंताचा किंवा
त्याचेच स्वरूप असणाऱ्या श्रीगुरूंचा घ्यावा!
भगवंतांनी त्यावेळी अर्जुनाचे निमित्त करून समस्त मानवजातीला दिलेला सल्ला म्हणजेच
“श्रीमद्भगवद्गीता! हा पहिला श्लोक मनुष्याच्या जीवनातील दुःखाचे मूळ कारण दाखवतो.
अर्थातच आसक्ती ! आणि आसक्ती मुळे “स्वधर्माचा” पडलेला विसर. “धर्म”
या शब्दाबद्दल अर्थांची अनेक वलय उत्पन्न झाली आहेत. याचाच शोध गीतेमध्ये घ्यायचा आहे.
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||